Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रबहिण आणि भावाचे अनोखे "रक्षाबंधन"

बहिण आणि भावाचे अनोखे “रक्षाबंधन”

सातारा(विजय जाधव) : रक्षाबंधन हा बहिण आणि भावाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. या दिवसाची दोघांनाही आतुरता असते. मात्र आयुष्यभर एकवेळ ही भावाला राखी बांधू न शकलेल्या दुर्दैवी बहिणीला रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला “तो भाऊ” भेटला आणि अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.

गोडोलीतील साईबाबा मंदिरासमोरच्या चौकात असलेल्या शगुन बेकरीमध्ये शुक्रवार दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक असा प्रसंग घडला, ज्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. आणि अनेकांनी मनाला चटका लावणारा पण प्रेरणादायी क्षण पाहिला.

दुकानात एक भिक्षेकरी महिला पोटाची भूक भागवण्यासाठी पैसे मागायला आली. गप्पांच्या ओघात ती हळूच म्हणाली – “रक्षाबंधन जवळ आलंय…! पण, मला भाऊ नाही. आयुष्यात एकदा ही राखी कोणाला राखी बांधली नाही. कोणाला तरी बांधायची आहे, पण भाऊ म्हणून कोणालाच बांधता येत नाही. मी तुम्हाला राखी बांधू का..?” एक अनोळखी भिक्षा मागणाऱ्या महिलेने शगुन बेकरीचे मालक असलेले इरफानभाई शेख यांना मोठ्या अपेक्षेने साद घातली.आणि त्या क्षणी इरफानभाई शेख यांच्या डोळ्यांत पाणी दाटलं. भावनिक स्वरात ते म्हणाले – “हो ताई, मला राखी बांध… आणि दरवर्षी येत जा.”असे त्यांच्या कंठातून शब्द बाहेर पडले.

इतकं ऐकताच त्या महिलेने आयुष्यात पहिल्यांदाच एका अपरिचित माणसाला – पण हृदयात माणुसकीचा झरा असणाऱ्या इरफानभाई शेख यांना राखी बांधली. बंधुभावाचा तो क्षण उपस्थितांनी पाहिला आणि मनापासून टाळ्या वाजवल्या.

हा प्रसंग पाहून सर्वजण स्तब्ध झाले. धर्म, जात, पंथ या पलीकडचं हे नातं असू शकते.
*”फक्त माणुसकीचा अद्वितीय धागा”*निर्माण होणाऱ्या या प्रसंगाची वार्ता
गोडोलीत पसरली. सर्वत्र इरफानभाईंच्या या हृदयस्पर्शी कृतीचं कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments