पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जागवणारी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक यात्रा – “शिवसूर्यहृदय जल यात्रा २०२५” – यंदा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या यात्रेचे आयोजन शिवसूर्यहृदय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून, यामागे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पाचे आधुनिक स्मरण व प्रसार हा उद्देश आहे.
२ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथून गंगेच्या पवित्र जलाचा कलश रायगडकडे प्रस्थान करत आहे. प्रख्यात धर्मगुरू आ. गोविंदगिरीजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या) यांच्या हस्ते जलकलश पूजन होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाराणसी प्रदेश अध्यक्ष श्री भास्करदत्त त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही जल यात्रा फक्त वाराणसीपुरती मर्यादित न राहता, प्रयागराज येथील गंगा-यमुना संगम आणि नाशिक येथील गोदावरी या त्रिवेणी नद्यांमधील पवित्र जल एकत्र करून पुढे पुण्यभूमीकडे येणार आहे.
पुणे व रायगडमध्ये खास स्वागत
९ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात जलकलशाचे स्वागत करण्यात येईल. भाविकांना श्रीफळ पूजन, आरती व दर्शनासाठी ही जल कलश सोहळा खुले राहणार आहे. रात्री ९ वाजता, रायगडकडे जलकलश घेऊन प्रस्थान होईल.
१० ऑगस्ट २०२५ रोजी, श्रावण कृष्ण प्रतिपदा या पवित्र दिवशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस, शिवसमाधीस व जगदीश्वर मंदिरास मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात येणार आहे. यानंतर रायगड अभ्यासदौरा व ध्यानसत्रही आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपतींच्या स्वप्नाचे स्मरण
या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिवरायांचे हे अजरामर स्वप्न:
“पेशावर ते तंजावर अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे”
हे विधान केवळ ऐतिहासिक नसून आजही प्रेरणादायी असल्याचे आयोजक सांगतात. भारत अधिक सशक्त, समृद्ध, आणि आत्माभिमानी बनावा; शिवतेज पुन्हा उजळावे – हाच या यात्रेचा खरा हेतू आहे.
आयोजकांचे आवाहन
पुष्कर काशिकर आणि प्रज्योत मुळे, शिवसूर्यहृदय प्रतिष्ठानचे संस्थापक, हे या यात्रेचे केवळ सेवक असल्याचे सांगतात. “हे कार्य केवळ आमचे नाही, हे आपले आहे – आपली संस्कृती, आपला इतिहास, आणि आपली जबाबदारी,” अशा शब्दांत त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.