मुंबई : कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या भागांमध्ये बालविकास करताना आजही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही कुटुंबांकडे शालेय फी भरण्याचीही ऐपत नाही तर काही मुलांमध्ये पोषणमूल्यांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत आहे. ही वाढती तफावत पाहून रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टनं ठोस पावलं उचलत जे कार्य केले त्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला असून टॉप नॉच फाउंडेशनतर्फे या ट्रस्टला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्कार २०२५ प्रदान करत या वर्षातील सर्वोत्तम बालविकास संस्था म्हणून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार अभिनेते आणि दिग्दर्शक सोनू सूद व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते, प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक गोपालसिंग सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागांतील शाळांमध्ये पौष्टिक जेवण, गरजू मुलांची फी भरून त्यांना पुन्हा शिक्षणात जोडणं, वह्यापुस्तकं, रेनकोट्स, स्वेटर्स आदी साहित्य वाटप करण्यात येते.