मुंबई(रमेश औताडे) : अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सुरू असलेला खटला फास्ट ट्रॅक न्यायालयीन कार्यवाहीत गेला आहे. या प्रकरणी ज्यांनी पाठपुरावा केला ते सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आभार मानले आहेत.
मांजरेवाडी तालुका खेड, जिल्हा पुणे ग्रामस्थांनी व टाव्हरे यांनी राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांची भेट घेऊन न्यायासाठी आवाज उठविला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना त्वरित कार्यवाहीचे लेखी निर्देश देत या प्रकरणाला गती दिली.
मुख्यमंत्री सचिवालय, विधी व न्याय विभाग, तसेच उच्च न्यायालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. विधी व न्याय विभागाने २ जून रोजी उच्च न्यायालय मुंबईच्या महाप्रबंधकांना पत्र दिले. त्यानंतर १७ जून रोजी पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांना फास्ट ट्रॅक कार्यवाहीबाबत कळवण्यात आले. सध्या या प्रकरणात जलद गतीने सुनावणी सुरू आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातील विद्याधर महाले, अमोल पाटणकर, स्वप्नील कापडनीस व गिरीश घुले यांचेही विशेष सहकार्य लाभले. मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत मिळावी यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित असल्याची बाब गृहविभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने. गृहविभागाने संबंधित प्रयोगशाळेला कार्यवाहीसाठी आदेश दिले असल्याने टाव्हरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.