मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय महिला अधिकाऱ्यांना जातीय द्वेषाने पछाडलेल्या काही लोकांकडून बदनामीकारक बातम्यांच्या माध्यमातून, प्राणघातक हल्ल्यांच्या व खंडणीच्या धमक्यांद्वारे त्रास दिला जात आहे, असा गंभीर आरोप आंबेडकरी महिला मोर्चाच्या विदर्भ प्रदेश नेत्या डॉ. सुधा जनबंधू यांनी केला आहे.
विशेषतः समाजकल्याण विभागातील महिला अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होत असून, हे लोक समाजविकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळे “असे नालायक भाऊ राखीसारख्या पवित्र सणास पात्र नाहीत. त्यांना राखी न पाठवता, बांगड्यांचं पार्सल त्यांच्या घराच्या पत्त्यावर पाठवणार आहोत,” अशी घोषणा जनबंधूंनी केली.
“भाऊ हा गुंडा असो वा निकम्मा, तो बहिणीच्या रक्षणासाठी सज्ज असतो. समाजातील प्रत्येक महिलेला बहीण समजून वागणं ही खरी राखी आहे. हेच स्मरण करून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आंबेडकरी महिला मोर्चाच्या या उपक्रमामुळे समाजात चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे. महिला अधिकाऱ्यांवरील अन्यायाविरोधात जनमानसात जागरूकता वाढवण्यासाठी हा संदेश महत्त्वाचा असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे.