मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार तुकाराम काते, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग वंदना कोचुरे उपस्थित होते.
मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, तिथे वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचा योग मला आला आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. हे उभारण्यात आलेले वसतिगृह ही फक्त वास्तू नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठीचा एक संकल्प आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “शिका आणि संघटित व्हा” हा संदेश, हीच खरी प्रेरणा आहे जी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक असलेलं बळ देते. शिक्षण हे सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीच शक्तिशाली साधन आहे. डॉ.बाबासाहेबांनी दिलेला हा मंत्र स्वीकारूनच आपण आत्मनिर्भर, सशक्त आणि न्याय्य समाज घडवू शकतो. विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, भविष्यात तुमच्यामुळे तुमच्या पालकांची समाजात ओळख निर्माण झाली पाहिजे, असे शिक्षण घ्या. स्वतःची ओळख निर्माण करा.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले, या वसतिगृहातून बाहेर पडणारे विद्यार्थी भविष्यात समाजात मानाचे स्थान मिळवतील, हीच अपेक्षा आहे. वसतिगृहातून शिकून विद्यार्थी आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनियर झाले आणि काही वर्षांनी याच प्रांगणात त्याचा कौतुक सोहळा झाला, तर तो क्षण मला पाहायला नक्कीच आवडेल.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरात शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणे ही एक मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांनी या संधीच सोन करावे. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आमदार तुकाराम काते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर रविकिरण पाटील, सहाय्यक आयुक्त ठाणे समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त रायगड सुनील जाधव, सहाय्यक आयुक्त वर्षा चव्हाण तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.