मुंबई : जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता दलालाही पुरेशा जागा मिळाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या चर्चेदरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी होणाऱ्या महामंडळावरच्या नियुक्त्यांमध्येही जनता दलाच्या प्रतिनिधींना संधी द्यावी, असा ठराव चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला. महायुतीचा घटक पक्ष म्हणून जनता दलालाही योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे मत नाथाभाऊ शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जनता दलाचे कार्याध्यक्ष सलीम भाटी यांच्यासह शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये भविष्यातील राजकीय सहकार्याची शक्यता या चर्चेमुळे बळकट झाली आहे.