मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. दिनांक ४ जून २०२५ व २६ जून २०२५ रोजी निवड समितीसमोर मुलाखती घेऊन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच ५५३ ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर घेण्याचे प्रदेशाध्यक्षांनी ठरविले असून पहिल्या टप्प्यात नवनियुक्त ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर पार पडणार आहे. त्यांनंतर टप्प्याटप्याने सर्वांचे शिबिर होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी या शिबिराची सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिबिराची सांगता होणार आहे. काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यातील विविध सामाजिक, राजकीय मुदद्यांवर या शिबिरात ऊहापोह केला जाणार आहे. नेते व विविध क्षेत्रातील वक्ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.