नवी मुंबई : माणूस हा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असून ‘माणुसकीच्या प्रतिष्ठापनेचे गाणे गाणारे साहित्यिक’ अशा शब्दात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनकृतींतून त्यांचे मानवतावादी व्यक्तीमत्व उलगडवत सुप्रसिध्द लेखक, समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांनी अण्णा भाऊंच्या विविधांगी विपुल साहित्यातून त्यांची जीवनदृष्टी व विचारदृष्टी समजून घेतली पाहिजे असे विवेचन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेंतर्गत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी ‘सामाजिक क्रांती आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे’ या विषयावर विविध दाखले देत अण्णा भाऊंच्या जीवनचरित्राला उजाळा दिला. यावेळी उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे व उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या शुभहस्ते व्याख्यात्यांना सन्मानीत करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे इतर स्मारकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे असून नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे ‘ज्ञानविचारांचे स्मृती स्मारक’ आहे असा गौरव करीत याठिकाणी आयोजित केली जाणारी मान्यवरांची व्याख्याने महामानवांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारी असल्याचे मत डॉ.रणधीर शिंदे यांनी स्मारकाचा गौरव करताना व्यक्त केले.
अण्णा भाऊ हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाप्रमाणेच अनेक चळवळीत प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेणारे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या लेखनातून समाजाच्या अंतरंगाचे अस्सल चित्रण उमटलेले दिसते. म्हणूनच, “मी कल्पिताच्या गोष्टी सांगत नाही” – असे म्हणणारे अण्णा भाऊ नवी दृष्टी देऊन जातात. साहित्यातून मान्यव्याची प्रतिष्ठापना करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर असल्याने त्यांच्या विचारांचा पैस वैश्विक होता हे डॉ.रणधीर शिंदे यांनी ‘फकिरा’ कादंबरी, ‘मरीआईचा गाडा’ व ‘सोन्याचा मणी ‘सारख्या कथा, ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही प्रचंड लोकप्रिय छक्कड – अशा अनेक साहित्यकृतींची उदाहरणे देत स्पष्ट केले. अण्णाभाऊंचे आणि गोविंदाग्रजांचे ‘महाराष्ट्र गीत’ यामधील फरकही त्यांनी उलगडवून दाखविला.
लोकपरंपरेतील मौखिकतेचा अण्णा भाऊंनी समाज प्रबोधनासाठी केलेला प्रभावी वापर विविध उदाहरणे देत सांगताना अण्णा भाऊंच्या कवितेत लढाऊ बाणा असल्याचे ते म्हणाले. अण्णा भाऊंच्या साहित्यातील निसर्गही मानवी सुखदु:खात सहभागी होणारा असून अण्णा भाऊंच्या साहित्यातील भाषेला मराठी मातीचा गंध असल्याचे सांगत डॉ.रणधीर शिंदे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील अस्सल भाषेचा स्वतंत्र अभ्यास व्हायला हवा असे मत मांडले.
अण्णा भाऊंच्या साहित्यावरील साहित्य आणि समिक्षा या ग्रंथाचे लेखक असणा-या लेखक डॉ.रणधीर शिंदे यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.