मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा सरकार धारावीकारंना विस्थापित करत आहे. धारावीकरांना मुलुंड, डंपिंग ग्राऊंड, मीठागरे याठीकाणी घरे देण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. धारावीत अदानीचे टॉवर उभे करून स्थानिकांना दुसरीकडे पाठवण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे पण धारावीकरांना धारावीतच घरे दिली पाहिजेत, मुलुंड अथवा इतर कोणत्याही जागी धारावीतील एकही कुटुंब स्थलांतर करणार नाही, असा स्पष्ट खणखणीत इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
धारावीतील लाखो लोकांना मुलुंडमध्ये घरे देण्याचा भाजपा सरकाचा प्रयत्न असून त्याला मुलुंडकरांचाही विरोध आहे, यासाठी काँग्रेसचे प्रवक्त राकेश शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांनी हे उपोषण समाप्त केले. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपाचे सरकार अदानीसाठी सर्व नियम डावलून मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी शून्य भावात देत आहे. कुर्ल्याची मदर डेअरी, मिठागरे, मुलुंड, देवनार डंपिंग ग्राऊंड, बांद्रा येथील जमिनी दिल्या आहेत. या भू माफियासाठी भाजपाचे सरकार पायघड्या घालत आहेत, अदानीसाठी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणविसांना फोन करतात व फडणवीस लगेच सरंडर होतात. या भू माफियाची जमिनीची भूक काही संपत नाही. मुंबईतील सर्वच जागा या लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा कुटील डाव भाजपा सरकारचा आहे.
मुंबई ही कोळी, आगरी, गिरणी कामगार, कष्टकरी यांची आहे. मुंबईवर या भूमिपुत्रांचा पहिला अधिकार आहे पण भाजपा जाणिवपूर्वक एका उद्योगपतीसाठी या स्थानिकांना विस्थापित करत आहे, हा प्रकार मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत मुंबईला हात लावू देणार नाही, असे वर्षा गायकवाड यांनी बजावले. मुंबईला वाचवण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडी लढत आहे व पुढेही लढत राहू असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
या आंदोलनास खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, राकेश शेट्टी, रमेश कोरेगावकर, राजोल पाटील, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, राजेश इंगळे, तुषार गायकवाड, कचरू यादव इत्यादी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.