मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. महसूल विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विभागाच्या कामाचा तसेच पुढील कामाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कायद्यांमध्ये बदल करायचा झाल्यास तो अवश्य करण्यात येईल. जाणीवपूर्वक झालेला कोणताही गैरप्रकार स्वीकारला जाणार नाही, असे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढून कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून विभागाचे कामकाज यापुढे संपूर्णपणे ई- ऑफिसच्या माध्यमातून चालणार असल्याचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.