प्रतिनिधी : जातीय तेढ, खोट्या बातम्या आणि खंडणीसारख्या प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या ‘साहसिक’ या वृत्तपत्राची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी विदर्भातून जोर धरू लागली आहे. यासाठी रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स ऑफ इंडिया (RNI), नवी दिल्ली यांना २५ हजार पत्र पाठविण्याची मोहीम सुरू झाली असून, लवकरच दिल्ली कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नामदेवराव निकोसे, रमेश दुपारे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, धर्मा बागडे व बबलू कडबे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी हे पत्रमोहीम आंदोलन सुरू केले आहे.
संपादकांच्या शपथपत्रात स्पष्टपणे नमूद असते की, वृत्तपत्रातून जातीय द्वेष, बदनामी अथवा गुन्हेगारी स्वरूपाचे मजकूर प्रसिद्ध केला जाणार नाही. मात्र, ‘साहसिक’ या वृत्तपत्राने या सर्व अटींचा भंग करून अनुसूचित जाती-जमातींच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत खंडणीसाठी द्वेषमूलक आणि निराधार बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित संपादकाविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच, वर्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनांत ‘साहसिक’ वृत्तपत्राचे नाव स्पष्टपणे नमूद करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.