मुंबई (रमेश औताडे) : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत सुरू प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, कोकण व तापी खोरे विकास महामंडळ ) मंत्री गिरिश महाजन, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील काळू नदी प्रकल्प हा महानगरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. भूसंपादन सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने हे काम पूर्ण करावे. भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्पासाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी.
वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, सहसचिव संजीव ताटू तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित जिल्हाधिकारी उपस्थित होते.