Thursday, July 31, 2025
घरमहाराष्ट्रआरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य...

आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अ‍ॅन्ड मिनिमल अ‍ॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (आयएमएमएएसटी) या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक तसेच दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या दोन्ही सामंजस्य करारामुळे आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल, जे त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यातील सामंजस्य करारामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि धोरण निर्मितीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. या करारामुळे आरोग्य क्षेत्रात तांत्रिक सहकार्य आणि धोरण पातळीवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. या दोन करारांमुळे महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या अधिक सशक्त होणार आहे.

पीएचएफआय ही संस्था भारतात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन व धोरण निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या कराराअंतर्गत खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे :

– राज्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम.

– सार्वजनिक आरोग्य धोरण, प्रशिक्षण धोरण आणि तांत्रिक सहकार्य यासाठी पीएचएफआयकडून मार्गदर्शन.

– आरोग्य प्रणाली व धोरणांवर आधारित संशोधन, नवतंत्रज्ञान आणि अंमलबजावणी.

– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ महाराष्ट्रात स्थापन करण्याची शक्यता.

– हा करारनामा ५ वर्षांसाठी असून, परस्पर सहमतीने आणखी ५ वर्षे वाढवता येईल.

पीएचएफआयने गेल्या १७ वर्षांत ४५,००० हून अधिक प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे. संस्थेने भारतातील ५८३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून धोरण निर्मितीपासून ते व्यावसायिक प्रशिक्षण, राष्ट्रीय तज्ज्ञ यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आयएमएमएएसटी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील करार – परिचारिकांसाठी व्यावहारिक प्रशिक्षणाचा नवा टप्पा

आयएमएमएएसटी ही राष्ट्रीय संस्था अतिदक्षता विभाग, परिचर्या, सर्जरी इत्यादी क्षेत्रातील हायपर-रिॲलिस्टिक सिम्युलेशन आधारित प्रशिक्षणासाठी ओळखली जाते. या कराराअंतर्गत पुढील ३ वर्षांत महाराष्ट्रातील १,००० परिचारिका, परिचारिका विद्यार्थी व सहयोगी आरोग्य सेवा व्यावसायिक यांना आयएमएमएएसटीच्या माध्यमातून अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात मास्टर ट्रेनर्स तयार करून प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

आरोग्य सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणार आहे. हा करार ३ वर्षांचा असून, आवश्यकतेनुसार विस्तार केला जाऊ शकतो.

आयएमएमएएसटीने आतापर्यंत २५,००० हून अधिक डॉक्टर आणि नर्सेसना २३ सुपर स्पेशालिटी विभागामध्ये प्रशिक्षण दिले असून, ३५ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments