प्रतिनिधी : दि. १ सप्टेंबर २०२५ पासून भारताच्या टपाल खात्यातून “नोंदणीकृत पत्र” ही सेवा बंद होणार आहे. काळ्या/निळ्या शाईने टाकलेली गंभीर पत्रं, ज्यामध्ये कायदेशीर महत्त्व, औपचारिकता आणि भावना यांचा मिलाफ असायचा – ते आता इतिहासजमा होणार आहे.
पूर्वी नोंदणीकृत पत्र म्हणजे घरात थरार निर्माण करणारा अनुभव असायचा. सरकारी नोकरीची ऑफर, कोर्टाची नोटीस, किंवा लांबून आलेला भाव… अशा प्रत्येक क्षणांचं हे पत्र साक्ष होतं. पोस्टमनही ते पत्र देताना एक वेगळाच आदर दाखवायचा.
आता ही सेवा “स्पीड पोस्ट”मध्ये विलीन केली जाणार आहे. त्यामार्फतच ट्रॅकिंग, पावती, कायदेशीर मान्यता इत्यादी सुविधा मिळतील. प्रक्रिया सुलभ होईल, पण “नोंदणीकृत पत्रा”ची जो गंभीरपणा आणि औपचारिकतेचा गंध होता, तो हरवेल अशीच भावना अनेकांना होतीये.
या बदलामुळे तंत्रज्ञानाची गती मिळेल खऱं, पण त्या “हातात पोचणाऱ्या भावनेचा ठसा” कायमचा निघून जाईल. कित्येक जुन्या सिनेमांची आणि आयुष्यातील वळणांची सुरुवात करणाऱ्या त्या पत्राचा, आता अखेरचा निरोप.
“नोंदणीकृत पत्र” हे केवळ एक पोस्टल सेवा नव्हतं, तर काळजाला भिडणारं स्मरण होतं – आणि आता तेही ‘स्पीड’मध्ये विरून जाणार आहे.