विशेष लेख :
आज नागपंचमीचा सण. खरे पाहता ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघायचे झाले तर नागलोक हे भारताचे मुलनिवासी. बौद्धकालीन पाच नागवंशीय राजे होऊन गेले ज्यामध्ये शेषनाग, वासुकीनाग, तक्षकनाग, करकोटानाग, इरावतनाग हे पाचही राजे बुद्धांच्या विचारावर चालणारे होते व बुद्धविचारांचे संरक्षण करणारे होते. याचेच प्रतिक म्हणून बुद्धांच्या पाठीमागे पाच नाग विविध शिल्पांमध्ये दाखविले जातात. नागवंशीय लोकांच्या काळापासून या सणाचे पुरावे सापडतात. भारतातील बऱ्याचश्या बौद्ध लेण्यांवर नागाचे शिल्प देखील मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. नागवंशीयांस पूजनीय स्थान होते हे आपणास बौद्ध ग्रंथ,लेण्यांवरील शिल्पपट,पहायला मिळतात तसेच मुर्त्या आणि सातवाहनकालीन धम्मलिपीतील शिलालेखात नागवंशीय राजांचा उल्लेख केलेला आढळतो. याच्या माध्यमातून विविध संदर्भ देखील सापडतात.
नागपंचमी हा सण कुठल्याही सापाशी निगडित नसून तो नागवंशीय राजांशी संबधित आहे. परंतु आत्ताच्या काळात नागपंचमी ला विकृत स्वरूपाचे महत्त्व प्राप्त झाले असून ती वैदीक पद्धतीने साजरी होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात तसेच भारतातील अनेक भागात नागपंचमीस वेगळे वळण मिळाले आहेत. हा सण विविध ठिकाणी वैदिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्रातील काही भागात वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथेनुसार हा सण साजरी केला जातो. यामध्ये बहुतांश ठिकाणी नागाच्या प्रतिमांचे किंवा चिखलाचे नाग बनवून त्याचे पूजन केले जाते तर काही भागात जंगलातून जिवंत नाग पकडून त्यांना गावात आणून त्यांची पूजा केली जाते. तसेच महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा सारख्या काही गावात नाग पकडून सापांची मोठी जत्रा च भरवली जाते.
समाजात सापांबद्दल अनेक गैरसमज, अंधश्रद्धा तसेच गैर रुढी परंपरा आपणास पहावयास मिळतात.
*नाग दुध पितो का..??*
नाही.
बऱ्याचदा या सणाच्या दिवशी सापांबद्दल मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रद्धेचा प्रसार देखील होत असतो. बऱ्याच ठिकाणी नाग पकडून त्याला हळद कुंकू लावून दूध पाजण्याचे प्रकार करण्यात येतात. खरे पाहता साप हा मांसाहारी वर्गातील प्राणी आहे त्यामुळे साप हा दूध पीत नाही आणि जर का आपण त्याला जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला तर सापाची पचन क्रिया बिघडते किंवा फुफुसात दूध जाऊन सापास श्वासोच्छ्वास करण्यास अडचण येऊन नाग मरतात. त्यामुळे असे प्रकार करू नयेत. मुळात नाग हा साप प्रमुख चार अतिविषारी सापांपैकी एक विषारी साप आहे त्यामुळे असे कृत्य करणे जिवावर बेतू शकते.
*साप डुख/डाव धरतो, बदला घेतो का..?*
नाही.
कोणताही साप डाव धरत नाही किंवा पाठलाग करत नाही कारण सापाच्या मेंदूचा एखाद्याला लक्षात ठेवण्याइतपत विकास झालेला नसतो. खरंतर सापांच्या मिलन काळामध्ये मादीच्या योनीतून विशिष्ट स्त्राव बाहेर पडत असतो व ती ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी त्याचा वास दरवळत असतो या वासामुळे नरसाप मादीच्या शोधात आकर्षित होत असतात. आणि जर का मानवी वस्तीमध्ये मादीस मारण्यात आले तर त्या वासामुळे नरसाप त्या ठिकाणी आपणास काही दिवस पुन्हा पुन्हा दिसत असतात व आपला असा गैरसमज होतो की साप बदला घेण्यासाठी पुन्हा आला आहे. या गैरसमजातून सापाची हत्या केली जाते.
*नागाच्या डोक्यावर नागमणी असतो का..?*
नाही.
चित्रपटांद्वारे व मालिकांद्वारे नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो असे सांगून बऱ्याचदा खोट्या अफवा रंगविल्या जातात तसेच काहीजण नागाची वरील बाजू फाडून त्यामध्ये नकली मनी टाकून आपणास नागमणी असल्याचे भासवितात परंतु असे काहीही नसते तर यामुळे सापास इजा होऊन साप मृत्यू पावतात.
*सापाच्या अंगावर केस व डोक्यावर तुरा असतो का..??*
खरे तर साप हा सस्तन प्राणी नसल्यामुळे त्याच्या अंगावर केस येत नाहीत. व नागाच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा तुरा नसतो. साप विशिष्ट काळानंतर अंगावरील कात टाकत असतो परंतु कात टाकत असताना त्याच्या अंगावरील कात काही प्रमाणात तशीच चिटकून राहून हवेने उडत राहते त्यामुळे ती डोक्यावर तुरा असल्यासारखी व अंगावर केस असल्यासारखी भासते.
*नाग पुंगी च्या तालावर नाचतो का..??*
नाही
बऱ्याच मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये पुंगीच्या तालावर नागास नाचवल्याचे दाखवले जाते परंतु सापास ऐकू येत नसल्याने तो पुंगी चा आवाज ऐकू शकत नाही तो आपणास पुंगीच्या तालावर नाचताना दिसतो पण खरे पाहता नाग या सापाची दृष्टी ही द्विनेत्री दृष्टी असल्यामुळे समोर हालचाल करणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तो एकटक बघत आकर्षित होत असतो. म्हणून गारुडी जिकडे पुंगी वळवतात तिकडे साप लक्ष केंद्रित करून डुलत असतो व त्यामुळे नाग नाचत आहे असे आपणास भासते.
*साप शेतकरी वर्गाचा खरा मित्र आहे. व अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कारण तो उंदरांवर नियंत्रण ठेवतो, धान्याची नासाडी थांबवतो, त्यामुळे त्याला दही, दुध,लाह्या याचा नैवेद्य न दाखवता त्याचे महत्त्व सर्वांना पटवून द्या. सापाला मारण्यापेक्षा वाचविण्यातच खरा आनंद आहे या विचारास आत्मसात करूया व त्याचे रक्षण करूया.*
सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय सदिच्छा..
सर्परक्षक विशाल राजेंद्र मोरे
वाई, सातारा