प्रतिनिधी : सर्व ऋतुंमध्ये शहर स्वच्छतेची काळजी घेणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी व सफाईमित्रांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आज सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबीरे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी राबविण्यात आली.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या माध्यमातून प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी यांच्या सहयोगाने आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त व स्वच्छता अधिकारी यांनी आपल्या सहका-यांसह हा उपक्रम यशस्वी केला.
यामध्ये बेलापूर विभागात माता बाल रुग्णालय, बेलापूर गाव, वाशी विभागात नागरी आरोग्य केंद्र वाशी से.1, घणसोली विभागात नागरी आरोग्य केंद्र घणसोली, ऐरोली विभागात नागरी आरोग्य केंद्र से.2 ऐरोली व दिघा विभागात नागरी आरोग्य केंद्र दिघा आणि नागरी आरोग्य केंद्र इलठणपाडा याठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करुन स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी व सफाईमित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये पुढील उपचारांची गरज असलेल्या स्वच्छताकर्मींना पुढील उपचारासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयामध्ये संदर्भीत करण्यात आले.
1 जुलै पासून सुरु झालेल्या सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान अंतर्गत दररोज स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करुन त्यामध्ये लोकसहभागावर भर देत शहर स्वच्छतेचा वसा जपला जात आहे.