पुणे, प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दारू विक्रेत्यांना ठणकावून इशारा दिला की, “मिरवणुकीदरम्यान जर कोणी दारू विकताना आढळले, तर त्यांच्या सात पिढ्या विसरणार नाहीत अशी कारवाई केली जाईल. एवढंच नाही तर दारू विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल.”
गणेशोत्सवाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व गणेश भक्त, कार्यकर्ते आणि मंडळांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. “गणेशोत्सव निर्बंधमुक्त असणार असला तरी सर्वांनी शिस्तीत वागावे, आत्मपरीक्षण करून जबाबदारीने उत्सव साजरा करावा,” असा सल्ला त्यांनी दिला.
या बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :
- टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार.
- डीजे परवानग्यांसाठी दहाव्या दिवशी मिळालेली परवानगीच अकराव्या दिवशीसाठी ग्राह्य धरली जाईल. त्याबाबत लिखित आदेश लवकरच देण्यात येणार.
- मंडळांशी थेट संवाद साधण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल.
- शाळांच्या आवारात पार्किंगची सोय करण्याचा विचार सुरू आहे.
- टिळक रोडवर स्वागत कक्ष उभारले जाणार आहेत.
“पुणे पोलिस दल हे सर्व गणेश भक्तांसोबत आहे. मात्र सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि उत्सवात शिस्त पाळावी,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
पोलिस आयुक्तांच्या या ठाम भूमिकेमुळे यंदाचा विसर्जन मिरवणूक उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.