प्रतिनिधी : शिक्षक भारती संघटनेने केलेल्या मागणीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू झाले आहे. मुंबईतील शिक्षकांना मुंबईत समायोजित करण्याचे काम सुरू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागिल तीन महिने संघर्ष करणाऱ्या शिक्षकांना आज दिलासा मिळाला अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई बाहेर करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता. मुंबई बाहेर समायोजनास शिक्षकांचा विरोध होता. परंतु शिक्षण विभाग ऐकायला तयार नव्हते. 1 मे रोजी शिक्षक भारती कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कोणीही मुंबई बाहेरील समायोजन घेऊ नये, संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन शिक्षक भारतीने केले होते. तसेच 2 मे रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमून मुंबई बाहेरील समायोजनास स्पष्ट लेखी नकार कळवला होता. शिक्षण उपसंचालक ऐकायला तयार नव्हते. समायोजन न स्वीकारलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तीन महिने बेकायदेशीरपणे बंद करण्यात आले होते. शिक्षक भारती संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबईतील शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 700 पेक्षा जास्त रिक्त पदावर तात्पुरते समायोजन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने तात्पुरते समायोजन करून घेण्यास सहमती दर्शवली होती. परंतु विद्यमान शिक्षक आमदारांनी मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी समायोजन करावे अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण समायोजन प्रक्रिया बंद पडली. कायमस्वरूपी समायोजन करून घेण्यास मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट नकार कळवला. तसेच समायोजित शिक्षकांचे वेतन व पेन्शन कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला. समायोजनाचा तिढा न सुटल्याने शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. आर्थिक नुकसान झाले.
सन 2015 साली अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला स्थगिती मिळवून त्यांना मुंबईत ठेवण्यात तत्कालीन शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांना यश आले होते. तसेच सन 2018 -19 मध्ये सुद्धा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेचा पर्याय दिल्यामुळे मुंबईतले शिक्षक मुंबईत कायम होते. आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे 700 जागा रिक्त आहेत. सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षकांचे तात्पुरते समायोजन मुंबई महानगरपालिकेत होऊ शकते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने समायोजनाचा कॅम्प लावला आहे. सर्व अतिरिक्त शिक्षकांना विनंती आहे की आपण या कॅम्प मध्ये सहभागी व्हावे. तात्पुरत्या समायोजनाचे हमीपत्र भरून द्यावे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सुभाष मोरे यांनी केले आहे.