कराड(विजया माने) : महायुती शासन जनतेसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी असणार्या योजनांची माहिती नसते. त्यासाठी आम्ही शासनाच्या सर्व योजनांच्या मोफत कॅम्पचे आयोजन करून त्याद्वारे नागरिकांना या योजनांचा लाभ देत आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुहास जगताप यांनी केले.
सुहास जगताप मित्र परिवाराकडून कराड दक्षिणचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सोमवार पेठेतील नवीन मतदार नाव नोंदणी अभियान व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत कार्ड या कॅम्पचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या दोन्ही कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी बजरंग माने म्हणाले, तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम सुहास जगताप व मित्र परिवार करत आहे. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचा अनेक नागरिक लाभ घेत आहेत. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या सुहास जगताप यांनी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयोश्री योजनाची मोफत नोंदणी, लाडकी बहिण योजना, बांधकाम कामगार योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी योजना असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
यावेळी दै. ‘पुढारी ’च्या पत्रकार प्रतिभा राजे व पत्रकार देवदास मुळे यांना राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हर्षवर्धन मोहिते, प्रमोद शिंदे, विश्वनाथ फुटाणे, सौ. सुधा ढवळीकर, सौ. साधना राजमाने तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
केंद्र व राज्य सरकारच्या जनतेसाठी असणार्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणार : सुहास जगताप
RELATED ARTICLES