नवी मुंबई | प्रतिनिधी : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील कोपरखैरणे रेल्वे स्टेशन आणि हार्बर लाईनवरील जुई नगर स्टेशन येथील प्रवाशांचे हाल संपायचं नाव घेत नाहीयेत. कोपरखैरणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 2 वरील पंखे गेले कित्येक दिवस बंद अवस्थेत आहेत, परिणामी उकाड्याने हैराण झालेले प्रवासी अक्षरशः श्वास घेण्यासाठी धडपडत आहेत.
त्याचवेळी, जुई नगर रेल्वे स्टेशनवरील पत्रे अनेक ठिकाणी गळत असून पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. छताच्या गळतीमुळे प्लॅटफॉर्मवर उभे राहणेदेखील कठीण झाले असून, प्रवासी चिडून बोलू लागले आहेत – “टिकिटाचे पैसे आम्ही वेळेवर देतो, मग सोयीसुविधांमध्ये ही दिरंगाई का?”
प्रशासनाचे दुर्लक्ष की ढिसाळ नियोजन?
या समस्यांबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, हे विशेष धक्कादायक आहे. कोपरखैरणे स्थानकावर उकाड्यामुळे वृद्ध, लहान मुले, महिला यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, जुई नगर स्थानकावर छतावरील गळतीमुळे प्रवाशांचे कपडेच नव्हे तर मोबाईल, बॅग, साहित्य भिजण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
प्रवाशांची मागणी : तात्काळ उपाययोजना करा!
रेल्वे प्रशासनाने या तक्रारींचे गांभीर्य ओळखून, कोपरखैरणे स्थानकावर बंद पडलेले पंखे तात्काळ दुरुस्त करावेत आणि जुई नगर स्टेशनवरील गळणारे पत्रे त्वरीत बदलावेत, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर यासंदर्भात मोर्चा, आंदोलने किंवा ऑनलाईन मोहीम सुरू करण्याचा इशारा काही प्रवासी संघटनांनी दिला आहे.