नवी मुंबई
कोपरखैरणे : आगामी गोकुळअष्टमी/गोपाळकाला आणि गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे पोलीस ठाणे व नवी मुंबई महापालिका (ई वॉर्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आण्णासाहेब पाटील सांस्कृतिक हॉल, सेक्टर-5, कोपरखैरणे येथे पार पडली.
बैठकीला 100 हून अधिक गणेशोत्सव आणि गोकुळअष्टमी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत न.मुं.म.पा. ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त भरत दांडे, वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश देशमुख, तसेच अग्निशामक दलाचे अधिकारी सहभागी झाले.
बैठकीत सण काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत – विशेषतः आग लागल्यास – घ्यावयाच्या उपाययोजना, तसेच वाहतूक व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मंडळांनी यंदा अधिक जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्व उपस्थित मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत उत्तम सहकार्याचे आश्वासन दिले.