मुंबई(रमेश औताडे) : स्वच्छ भारतचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा वसा घेऊन स्वच्छता दूत फाउंडेशन कार्य करीत आहे. या फाउंडेशनच्या सफाई कामगार प्रशिक्षण केंद्राचे समाज भूषण सुदाम आवाडे यांच्या हस्ते नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले.
मानखुर्द येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण नाटकर, ज्ञानदेव साठे, रमेश पांडव, रामचंद्र गायकवाड, अंद्रेश गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी समाज भूषण सुदाम आवाडे यांनी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने २० वर्षांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता कामगारांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच स्वच्छता कामगार केंद्राच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित करून अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांनी, कोरोनाच्या महामारीत फाउंडेशनने राज्यभर केलेल्या स्वच्छता सेवेची सिने अभिनेते महानायक अमिताभ बच्चन तसेच अक्षय कुमार यांनी दखल घेऊन त्यांना कौतुकाची थाप दिल्याचे नमूद केले.
फाउंडेशनने २० वर्षांत सुमारे १५ हजार कामगारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. यापुढे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश पाखरे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविले आहे.
कार्यक्रमास माया साबळे, ताईबाई पाखरे, रत्नमाला राजगिरे, मंदाबाई आठवले, शिल्पा गायकवाड, रिबेका पाखरे, अरुण गायकवाड, किशोर पाखरे, पल्लवी पाखरे, आरती पाखरे, सलोनी काळुंखे, मोतीलाल पाखरे, अनोश पाखरे, अर्पित पाखरे, सीमा गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, अण्णा भाऊ साठेनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.