नवी मुंबई : सन 2025 या वर्षात श्रीगणेशोत्सव हा दि. 27 ऑगस्ट 2025 ते 06 सप्टेंबर 2025 आणि नवरात्रौत्सव हा दि. 22 सप्टेंबर 2025 ते दिनांक 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे.
त्या अनुषंगाने या उत्सवांचे सुव्यवस्थित आयोजन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग, वाहतुक पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळाचे पदधिकारी यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली.
या बैठकीप्रसंगी उपस्थित 63 गणेशोत्सव/ नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी सूचना केल्या. त्या सर्व सूचना लक्षात घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्लास्टिक व थर्माकोलमुक्त पर्यावरणपूरक, पारंपारिक सजावट करण्याचे तसेच प्रतिष्ठापना करावयाच्या सार्वजनिक तसेच घरगुती श्रीगणेशमूर्तीही पर्यावरणपूरक असाव्यात असे उपस्थितीतांना आवाहन केले.
श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सव दरम्यान ध्वनीप्रदूषण होणार नाही व त्याचा नागरिकांना तसेच शाळेतील मुलांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही सूचित करण्यात आले.
गतवर्षी ज्या मंडळांनी परवाना घेतला असेल तो 05 वर्षांकरिता असणार आहे. त्यामुळे यावर्षी सदर मंडळांनी अग्निशमन, पोलीस व वाहतुक पोलीस विभागाकडून ना हरकत दाखला प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे ऑनलाईन पोर्टल www.nmmc.gov.in या वेबसाईटवर अर्ज करुन ते प्राप्त करुन घेता येणार आहेत. त्यासोबत नवीन गणेश मंडळांनीसुध्दा याच पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शन सूचना (Advisory) निर्गमित करण्याबाबत सूचित करण्यात आले.
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मा.उच्च न्यायालयाने दि. 23/07/2025 रोजीच्या आदेशान्वये 05 फूटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच करण्याबाबत आदेशित केले असल्याची बाब उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत महापालिकेसमवेत जनजागृती करण्यात येणार असल्याचे नमूद केले.
यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी नमूद केले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी अनधिकृतपणे विजेच्या खांबांवरून वीजजोडणी न करता, रितसर अर्ज करून तात्पुरती विद्युत जोडणी करुन घ्यावी.
वाहतुक पोलीस उपआयुक्त यांनीही श्रीगणेश मंडळांचे मंडप व कमानी ह्या रस्त्यावर येणार नाहीत व त्यामुळे वाहनांना अडथळा होणार नाही व वाहतुक कोंडी होणार नाही तसेच, त्या विनापरवानगी उभारल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना मंडळांना केल्या. तसेच, वाहतुक विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीत जड-अवजड वाहनांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी गणेश मंडळांनी आरास करतेवेळी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पध्दतीचे देखावे करावेत. बॅनर्स/जाहिराती ह्या मर्यादित स्वरुपाच्या कराव्यात जेणेकरून शहराचे विद्रुपीकरण होणार नाही. तसेच, श्रीगणेश मंडळांनी व नागरिकांनी विसर्जनानंतर पूजेचे साहित्य हे महापालिकेमार्फत ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांमध्येच टाकण्याचे आवाहन केले.
या बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, उपआयुक्त परिमंडळ-01 श्री.सोमनाथ पोटरे, उप आयुक्त परिमंडळ-02 श्री. संजय शिंदे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे, समाजविकास उपायुक्त श्री.किसनराव पलांडे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे तसेच सर्व विभाग अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री. पडवळ, पोलीस उपआयुक्त वाहतुक श्री.तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.मयुर भुजबळ आणि सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व महावितरण कंपनीचे प्रतिनिधी आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 63 श्री गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष,सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
RELATED ARTICLES