मुंबई :
धारावीतील छत्रपती शिवाजी विद्यालय व राजे शिवाजी विद्यालयात आषाढ अमावस्येनिमित्त पारंपरिक दीप पूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा सन्मान विद्यार्थ्यांनी “शौर्य ज्योति नमोस्तुते” म्हणत केला. शिवरायांचे हे किल्ले म्हणजे शौर्याची जिवंत प्रतीके आहेत, असे म्हणत विद्यार्थ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” चा गजर केला.
या कार्यक्रमात कलाशिक्षक विशाल जाधव आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र व तामिळनाडूचा नकाशा शेकोडो दिव्यांनी सजवून साकारला, त्यात शिवरायांचे चित्र व किल्ल्यांचे फोटो ठेवल्यामुळे दीप पूजनात इतिहास उजळून गेला. रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जिंजी आदी १२ किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे.
या वेळी शिवरायांची युद्धनीती, पराक्रम आणि स्थापत्यकलेचा गौरव यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाला चेअरमन बाबुराव माने, सचिव दिलीप शिंदे, प्राचार्य स्वाती होलमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.