कराड : कराड नगरपरिषदेत कार्यरत असताना एका बिल्डरकडून १० लाखांची लाच मागणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. सोमवारी त्यांना फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवार पेठेतील एका अपार्टमेंटच्या बांधकाम परवानगीसाठी खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख व खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांनी संगनमताने बिल्डरकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी २४ मार्च रोजी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तौफिक शेखला रंगेहाथ पकडले होते.
खंदारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र ९ मे रोजी तो फेटाळण्यात आला. त्यानंतरही दोन महिने अटळ असलेले खंदारे अखेर २२ जुलै रोजी अटकेत आले.
विशेष म्हणजे, खंदारे हे त्या वेळी मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त झाले होते. तरीही त्यांनी मागील तारखेच्या चलनावर सह्या करून व्हॉट्सअपवरून फाईल देव यांच्याकडे पाठवली होती. हे सर्व लाच घेण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात आले, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, सरकार पक्षातर्फे अॅड. आर. सी. शाह यांनी न्यायालयात बाजू मांडली.