मुंबई : “महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त” या मोहिमेअंतर्गत मुंबई काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. या वेळी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक मोहसिन हैदर आणि प्रवक्ते निजामुद्दीन राईन उपस्थित होते.
सावंत यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेतील भांडुप (२००० MLD) आणि पांजापूर (९१० MLD) या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार झालेला आहे. भांडुप प्रकल्पासाठी काढलेल्या ४३७६ कोटींच्या निविदेत सातवे जोडपत्रक काढून पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आला. भारतातीलच अनुभव आवश्यक असल्याचे अट घालून जागतिक कंपनांना बाहेर ठेवत, ठराविक कंत्राटदारालाच फायदा मिळवून देण्याचा डाव रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे निविदेचा दर मूळ किंमतीपेक्षा सुमारे ३०% अधिकाने मंजूर झाला.
पांजापूर प्रकल्पासाठी काढलेली निविदा आठ वेळा पुढे ढकलण्यात आली आणि अखेर “कोणीही प्रतिसाद दिला नाही” या कारणावरून रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कठीण अटींसह निविदा प्रसिद्ध झाली. यामध्येही भारतातीलच अनुभवाची अट घालण्यात आली असून, यात ठराविक कंपन्यांना प्राधान्य देण्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले की मंत्रालय व महापालिका कार्यालये दलालांच्या कब्जात आहेत. निविदांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, हे प्रकरण केवळ निधी अपहाराचे नाही, तर जागतिक स्पर्धा संपवून भ्रष्ट साखळीला पाठीशी घालण्याचे लक्षण आहे. १६ जुलै २०२५ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.