मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार असून, महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली नाट्यकृती सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक रविंद्र देवधर यांच्या दिग्दर्शनाखालील ‘मी भारतीय’ या सामाजिक संदेश असलेल्या दीर्घांकाचे मोफत सादरीकरण मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्रायोगिक रंगभूमीवरील गुणवत्तापूर्ण नाट्यकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यरसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोग विनामूल्य अनुभवण्याची संधी देणे हा आहे.
कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी नाट्यप्रेमींना या विशेष कार्यक्रमासाठी मन:पूर्वक निमंत्रण दिले आहे.