प्रतिनिधी :
सॅन होजे (कॅलिफोर्निया) येथे २५ ते २७ जुलै दरम्यान ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ (NAFA) च्या वतीने भव्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये हा तीन दिवसीय सोहळा अनेक मराठी चित्रपट तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात २५ जुलैला रेड कार्पेट एन्ट्री व ‘फिल्म अवॉर्ड्स नाईट’ने होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २६ व २७ जुलै रोजी ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’, मास्टरक्लासेस, पॅनल डिस्कशन्स आणि ‘मीट अँड ग्रीट’चे विविध सत्रे आयोजित करण्यात आले आहेत.
स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत संवादाचे सत्र होणार असून अनेक नवीन चित्रपट व लघुपटांचे प्रीमियरही पाहायला मिळणार आहेत.
तसेच ‘क्रिएटर्स मीट-अप’, ‘डबिंग वर्कशॉप्स’, ‘फिल्म एक्स्पो’सारखे उपक्रम युवा पिढीसाठी आकर्षण ठरणार आहेत. बीएमएमच्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे या उपक्रमास सहकार्य लाभले आहे. ‘नाफा २०२५’ हा महोत्सव केवळ मनोरंजन नव्हे, तर मराठी चित्रपट सृष्टीचा एक जागतिक मंच ठरणार आहे.