मुंबई : परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी एफसीआरए निधी प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या परदेशी निधी सोबत मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करत आता गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे.
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कार्पोरेट कंपनी, रूग्णालय आणि त्यासोबत काही प्रमाणात रूग्णांचेही योगदान घेत आता राज्यातील आर्थिक मागास रुग्णास उपचार मिळणार आहेत. ज्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च १० लाखांपेक्षा अधिक असेल, असे दुर्धर व गंभीर आजाराचे रुग्ण पात्र ठरणार आहेत.
रूग्णांना कक्षा तर्फे बनविण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टल मार्फत अर्ज सादर करावा लागणार आहे. धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा वार्षिक उत्पन्न १.८० लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांसाठी मोफत राखीव ठेवाव्या लागतात. तर १० टक्के खाटा ३ लाख ६० हजार उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात उपचाराकरिता राखीव ठेवल्या नसतील तर टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा. असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक सांगितले.