Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रअजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी!

अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी!

महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही अनिवार्य (नसली तरी) असल्याचे दिसून येते. आपल्या मुलांना पुढे आणण्याचा फटका ज्या कार्यक्षम व्यक्तीला बसला आहे त्यात अजित अनंत पवार यांचा क्रमांक वरचा आहे. बाकीचा उहापोह करणे आजच्या या प्रसंगी अप्रस्तुत आहे. जानेवारी ते डिसेंबर या इंग्रजी दिनदर्शिकेत वाढदिवस, जयंती याकडे लक्ष दिले तर दोन दोन व्यक्तींची जयंती, वाढदिवस एकाच दिवशी येत असल्याचे लक्षात येते. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांची जयंती. २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रामदास कदम यांचा वाढदिवस. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती. १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस तर गोपीनाथ मुंडे यांची जयंती. आणखी एक दिवस असा येतो की ज्या दिवशी बॅरिस्टर नाथ पै आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. तो म्हणजे २५ सप्टेंबर. आज आपण देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवशी प्रामुख्याने अजितदादा यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. चर्चा नव्हे तर मी अजितदादा यांच्या संदर्भात माझी मते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे अजितदादा, एक परखड आणि मुरब्बी राजकारणी म्हणून मला ते प्रचंड भावलेत. माझ्या सुमारे अर्धशतकी राजकीय पत्रकारितेत मी कधी अजितदादा यांना भेटलेलो नाही. माझी त्यांची घसटही नाही. नाही म्हणायला एकदा मित्रवर्य संजय देशमुख यांच्या सौजन्याने कोरोना महामारीच्या काळात माझी ‘पासष्टायन’ आणि ‘गुरुजी’ तसेच ज्येष्ठ सहकारी विजय वैद्य यांचे ‘आठवणीतले प्रबोधनकार’ आणि रेखा बोऱ्हाडे यांचे ‘ओंजळीतली फुले’ ही पुस्तके देण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजितदादा यांची भेट घेतली होती. विजय वैद्य यांचे पुस्तक देताच दादांनी आपलेपणाने विजय वैद्य यांची चौकशी केली आणि आता त्यांचं वय काय असेल ? अशी आपुलकीने विचारणाही केली. पुस्तक थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या संदर्भात असल्याने त्यांनी आवर्जून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. उभ्या उभ्या ते पुस्तक चाळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. ‌तसे विधानभवन आणि मंत्रालयात पत्रकार परिषदेत दादांबरोबर सवाल जवाब झाले आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या पुण्याच्या केसरीचे सुमारे वीस वर्षे राजकीय प्रतिनिधी असलेले मित्रवर्य विजय भोसले यांचे अजितदादा पवार यांच्या बरोबर चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्याकडून दादांच्या परखड स्वभावाचे वर्णन ऐकायला मिळत असे. दुर्दैवाने कोरोनाने विजयरावांचा बळी घेतला. एकेकाळी पत्रकारितेत सोबत वाटचाल करणारे मित्रवर्य संजय मिस्किन हे दादांचे माध्यम समन्वयक असल्यामुळे दादांसाठी पत्र/निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करीत असतो. पण एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून दादा अतीशय भन्नाट माणूस. काकाश्री शरदचंद्र गोविंदराव पवार यांची राजकीय गणिते कुणालाही कळण्याच्या/समजण्याच्या पलिकडची आहेत. आजही नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या या अव्वल राजकारण्याने मारलेली गाठ/मेख भलेभले सोडवू शकलेले नाहीत. आव भले भरपूर आणतील, पण ते निव्वळ अशक्य आहे. राजकारणात यशवंतराव चव्हाण हे गुरुस्थानी मानलेल्या शरद पवारांना अजित पवार यांनी गुरुस्थानी मानणे चुकीचे नाही. राजकारणात आपली राजकीय सोय म्हणून काहीवेळा आपल्या माणसाला पुढे आणले जाते. असेच अजितदादांना लोकसभेवर पाठविण्यात आले आणि नंतर त्यांच्या जागी काकाश्री शरदचंद्र पवार पोहोचत केंद्रात संरक्षणमंत्री झाले. अजितदादा सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनले आणि त्या काळात दादांच्या शिवनेरी बंगल्यावर साहेबांचे दुसरे सत्ताकेंद्र सुरु असायचे. सुधाकरराव नाईक यांनी शरद पवार यांच्या नाकी नऊ आणल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. काही घटना आमच्या समोरच घडल्या आहेत. मग सुधाकरराव नाईक यांना पाय उतार करायला लावीत शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री बनले. बाबरी मशीद उद्ध्वस्त होणे, मुंबई मधील दंगल आणि बॉम्बस्फोट मालिका हा १९९१ ते १९९३ चा काळ. पवारांचे राजकारण दिल्ली ते गल्ली एकदम धूमधडाक्यात सुरु होते. अजितदादा काकाश्रींच्या तालमीत कसलेले राजकीय खेळाडू बनत चालले होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करीत होते. काकांचाच बालेकिल्ला असलेल्या काटेवाडी, बारामती, पुणे जिल्हा, सहकारी चळवळ यात दादा मागे वळून पहायच्या स्थितीत नव्हते. शरदचंद्र पवार यांच्या सुकन्या सुप्रियाताई हळूहळू राजकारणात येऊ लागल्या आणि शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनामुळे त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. १९९९ साली सोनिया गांधी यांचे विदेशी मूळ कारण पुढे करीत शरद पवार, तारीक अन्वर आणि पूर्णो संगमा या अमर अकबर अँथनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. ऐनवेळी शरद पवार यांनी पवित्रा बदलला, चार मंत्रिपदे जास्त पदरात पाडून घेतली आणि विलासराव देशमुख यांना समर्थन दिले. कार्यक्षम असूनही अजितदादा यांच्या तोंडून मुख्यमंत्रिपदाचा घास हिरावला गेला. ती सल दादांच्या मनात कायम होती. पण त्यांनी ती बोलून दाखविली नाही. राजकारणात प्रत्येक नेत्याचे समर्थक तयार होत असतात तसे दादांच्या समर्थकांचा गोतावळा वाढू लागला. असंतोषाची वाफ कूकरमध्ये साचत होती, शिट्टी वाजण्याचा अवकाश होता. उपमुख्यमंत्री पदाचे विक्रम दादांच्या नावांवर वाढू लागले. २०१९ ते आजवर २३ नोव्हेंबर २०१९, २८ नोव्हेंबर २०१९, ५ डिसेंबर २०२४ अशा तीन वेळा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. २३ नोव्हेंबरच्या पहाटेचा शपथविधी गाजला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारला उलथविल्यानंतर ज्या अजितदादांनी “जे शिवसेना सोडून गेले ते कधी पुन्हा निवडून आले नाहीत”, असा छगन भुजबळ यांच्या नावाचा दाखला दिला त्याच सरकार मध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतला. अजितदादा पवार यांची ती राजकीय गरज होती. जसे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून नेले तद्वतच अजित पवार यांनी काकांचा पक्ष आणि चिन्ह नेले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण अजित पवार यांना हे कां करावे लागले याचा संबंधितांनी अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. साचलेली असंतोषाची वाफ शिट्टी वाजताच बाहेर पडली. पण या संपूर्ण काळात अजितदादा यांनी दाखविलेला संयम वाखाणण्यासारखा म्हणावा लागेल. अजितदादांनी आपल्या परखड वक्तव्याचा अनेकदा प्रत्यय आणून दिला. इतकेच काय तर रावसाहेब रामराव (आर आर) पाटील यांनाही दादांच्या कानपिचक्या खाव्या लागल्या आहेत. गुटख्यावरुन, मतदारसंघात निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यावरुन दादांनी आबांना जाहीरपणे ऐकवायला कमी केलेले नाही. असे असले तरी आबांच्या देहावसानानंतर आबांच्या मुलीचे लग्न अजितदादा आणि सुप्रियाताई या दोघा बहिण भावांनी आपल्या कुटुंबातला शुभप्रसंग समजून स्वतःच्या संपूर्ण देखरेखीखाली पार पाडून मानवतेचा परमोच्च बिंदू गाठल्याचेही समाजाने पाहिले आहे. स्वतः शिस्तीचे पालन करणारे असल्याने दादांना दुसऱ्या कुणी बेशिस्त वागलेले अजिबात आवडत नाही. कुणाला कानपिचक्या दिल्या तरी तेवढ्यापुरते, बाकी संबंध सौहार्दाचे. त्यात कसूर नाही. फटकळपणाचा कधी कधी त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. धरणावरुन असेच एकदा दादा बोलून गेले मग कराडच्या प्रीतिसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर प्रायश्चित्त घ्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना दादा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर दादांनी टिप्पणी केली. तेंव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्काराचे शस्त्र उगारले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पृथ्वीराज बाबा आणि अजितदादा पत्रकार परिषद घेत असत. परंतु पत्रकारांनी बहिष्कार टाकताच दादांनी स्वतः या परिषदेला येणे टाळले. काही महाभागांनी सकाळी बहिष्काराची भाषा बोलत असतांना सायंकाळी मात्र दादांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन जाहिरातीचे दर वाढवून घ्यायलाही कमी केले नाही, अशी चर्चा होती. लोकशाही आघाडी असो, महाविकास आघाडी असो की महायुती. सरकार मध्ये काम करतांना राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास/विचार सर्वप्रथम. जे जमण्यासारखे असेल ते केल्याशिवाय राहणार नाही आणि जे जमणार नसेल तर लोंबकळत ठेवणार नाही, हा दादांच्या कार्यपद्धतीचा खाक्या. गुळगुळीत आणि मुळमुळीत राजकारण दादांना कधी जमलेच नाही. माणुसकी, प्रामाणिकपणा याचे ओतप्रोत दर्शन दादा आपल्या कार्यपद्धती मधून घडवितात. दादांचा करारी बाणा असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात हळवेपणा सुद्धा निश्चित दिसून येतो. पुत्र पार्थच्या निवडणुकीच्या वेळी काकाश्रींच्या भूमिकेमुळे दादांच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहिल्या नाहीत परंतु त्यांनी ते दाखवून दिले नाही. आजच्या सक्रीय राजकीय परिस्थितीत दादा जरी उपमुख्यमंत्री असले तरी ते शरद पवार यांच्या खालोखाल अनुभवी नेते आहेत. संसदीय लोकशाहीतील त्यांचा अनुभव गाढा आहे, मोठा आहे. प्रसंगावधान, समयसूचकता, तारतम्य, हसत हसत शेरेबाजी करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. कार्यकर्त्याला सांभाळणे, प्रसंगी त्याची चूक त्याच्या पदरात घालणे हेही दादांचे वैशिष्ट्य आहे. पक्षीय राजकारणामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता येणार नाही, हे त्यांनी कटाक्षाने पाळले आहे. म्हणूनच कौटुंबिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून कौटुंबिक सौहार्दाचे वातावरण त्यांनी टिकविले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका बाजूला पत्नी सुनेत्रा आणि दुसऱ्या बाजूला बहिण सुप्रिया यांच्यात ‘सामना’ झाला तरी त्यामुळे कटुता येणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. सुनेत्रा वहिनींना राज्यसभेवर पाठवून दादांनी कसर भरुन काढली. सासरे आणि सून एकाच सभागृहात विरोधी आणि सत्तारुढ बाकांवर दिसण्याचा योगायोग ही सुद्धा संसदीय लोकशाहीची देणगीच म्हणावी लागेल. काटेवाडीच्या घरात कौटुंबिक सौहार्दाचे क्षण वरचेवर येत असल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होण्याच्या, दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्यांना उधाण आले तर त्यात नवल ते काय ? राजकीय सारीपाटावर कोणत्या सोंगट्या कुठे हलवायच्या यात काका पुतणे वाकबगार आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि अजितदादा यांच्या स्वभावात साधर्म्य आहे, असे मला वाटते. जे ओठात ते पोटात आणि जे पोटात ते ओठात. कदाचित यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्या दोघांत चांगला समन्वय दिसून येत होता. आज दादा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो तसेच मुख्यमंत्री पदावर करड्या शिस्तीचा प्रशासक या नात्याने अजितदादा पवार यांना संधी मिळो, त्यांची स्वप्नपूर्ती होवो, हीच सदिच्छा !

योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments