प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, यंदाही हे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री. ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ पासून ऊसतोड मजूर, स्थलांतरित कामगार, आदिवासी व खाणकामगारांची मुले या विद्यार्थ्यांना शिक्षणात सामावून घेण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतात.
यावर्षीही शाळा बाह्य सर्वेक्षणातून गिन्तेश शांतीलाल बारेला, नंदनी रियान सिंह, दिपाली अक्षय पवार हे मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले विद्यार्थी शाळेत दाखल करण्यात आले. आधार कार्ड नसल्यामुळे पालक सुरुवातीला उदासीन होते, मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तकं, वह्या, बूट-सॉक्स यासह शालेय साहित्य देण्यात आले.
या उपक्रमात उपशिक्षक श्री. रेवणनाथ सर्जे, सौ. सुनिता शिंदे, सौ. मनिषा चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वर्गशिक्षकांनीही पालकांचे प्रबोधन करून १००% उपस्थितीवर भर दिला. सामाजिक भावनेतून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी शाळेने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश गवळी, विस्तार अधिकारी श्री. नवनाथ कुचेकर, व केंद्रप्रमुख श्री. संतोष खलाटे यांनी व्यक्त केले आहे. शाळेतील शिक्षकांचे हे प्रयत्न खऱ्या अर्थाने शिक्षण साक्षरतेच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे ठरले आहेत.