मुंबई : आझाद मैदानावर प्लास्टिक फुलाविरोधात करत असलेल्या आंदोलनाला यश मिळाले, अखेर निसर्गाचा विजय झाला. कृत्रिम फुलांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाला राज्य सरकारने मान्यता दिली असून, अधिवेशनात कृत्रिम फुलांच्या वापरावर आंशिक बंदी घालण्याचा आणि नैसर्गिक फुलांना प्रोत्साहन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर आज आझाद मैदान पुन्हा एकदा सजीव झाले. आनंदाश्रूंनी डोळे भरले, गुलाबांच्या पाकळ्यांतून आभार व्यक्त झाले, आणि “निसर्गाचं रक्षण करा – शेतकरी वाचवा!” हे घोषवाक्य हवेत घुमू लागलं.
फूल उत्पादक शेतकरी संघटनेचे सचिव धनंजय कदम म्हणाले,
हा फक्त आमचा विजय नाही, ही निसर्गाशी प्रामाणिक बांधिलकी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची वैचारिक जिंक आहे. सरकारने आमचा आवाज ऐकला, ही लोकशाहीची खरीखुरी ताकद आहे. स्वतः संबंधित खात्याचे फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले हे मैदानात येऊन आश्र्वासित करून गेले. यावेळी सुनील शेळके देखील उपस्थित होते.
राज्य सरकारने पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक फुलांच्या उत्पादनासाठी अनुदान योजना, सुधारित बाजारपेठ व्यवस्था, आणि आधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश करण्याची ग्वाही दिली आहे.
आजचा दिवस महाराष्ट्रातील फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरला आहे. केवळ फुलांच्या सुगंधाने नव्हे, तर त्यामागील संघर्षाच्या घामगंधाने आज आझाद मैदान बहरलं होते.