मुंबई : पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. नवीन टॅरिफनुसार महाराष्ट्राचा औद्योगिक दर ₹८.३२ वरून ₹७.३८ रुपये होणार असून, हा दर तमिळनाडू, गुजरात व कर्नाटकाशी तुलना करता कमी असेल.
टॅरिफ ट्रू-अपमुळे दर वाढणार नाहीत. ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने वीज खरेदी केल्याने खर्चात बचत होते. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजमुळेही वीज खरेदी स्वस्त झाली आहे. यामुळे दीर्घकालीन करारांतून दर स्थिर राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रहिवासी ग्राहकांनाही दिलासा देत १०० युनिटखाली वीज वापरणाऱ्यांसाठी २६ टक्के दरकपात जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी सोलर पंप व सिंगल पोल योजनांमध्ये बदल करण्यात आले असून, स्मार्ट मीटर बसवून अचूक वीज वापर मोजला जाणार आहे. लिफ्ट इरिगेशनसाठी स्वतंत्र सोलरायझेशन प्रपोजल तयार असून डार्क झोन्ससाठी पारंपरिक वीजपुरवठ्याचा विचार केला जाणार आहे.