मुंबई : सण-उत्सवांमध्ये सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे पारंपरिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी सह्या करून पाठिंबा दर्शवला आहे.
या निवेदनावर तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत लवकरच विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री भरत गोगावले यांनी देखील शासन प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची पावले
आ. रोहित पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, फुलशेती हे द्राक्ष व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. मात्र, प्लॅस्टिक फुलांमुळे बाजारात नैसर्गिक फुलांना भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च गाठूनही त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
या कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे रासायनिक रंग आरोग्यासाठी हानिकारक असून पर्यावरणालाही धोका निर्माण करतात. त्यामुळे, प्लॅस्टिक पिशव्या प्रमाणेच प्लॅस्टिक फुलांवरही कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी शेतकऱ्यांची व आमदारांची एकमुखी मागणी आहे.
विधिमंडळातही आवाज उठवला
या मागणीला पाठिंबा देताना आमदार महेश शिंदे यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यानंतर या विषयावर शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला असून, तातडीची बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच
“कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतोच, पण त्याचबरोबर रासायनिक रंग वापरणेही थांबेल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय उपयुक्त ठरेल,” असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाच्या या हालचालीमुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, कृत्रिम फुलांवर बंदी लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.