कराड(प्रताप भणगे) : राज्याचे माजी सहकार मंत्री आणि लोकनेते स्व. विलासकाका पाटील उर्फ काका (उंडाळकर) यांच्या ८७व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. १५ जुलै रोजी रयत संघटना यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठोबाचीवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्व. विलासकाका पाटील यांनी सहकार क्षेत्रात केलेले कार्य आणि ग्रामीण जनतेसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, त्यांचे नातू कु. आदिराज उदयसिंह पाटील (बाबा उंडाळकर) यांनी हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. योगेश पाटील आणि गुरव सर यांनी केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मीना खरात मॅडम, शिक्षक पांडुरंग पवार सर, विठोबाचीवाडी व विठ्ठलवाडी गावचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळेल आणि स्व. पाटील यांची स्मृती अधिक प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.