प्रतिनिधी : दलित पँथरचे सहसंस्थापक, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक ज. वि. पवार यांचा वाढदिवस आणि दलित पँथरच्या वर्धापन दिनाचा सोहळा १५ जुलै रोजी शिवाजी नाट्य मंदिर येथील शाहू महाराज सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी दलित युथ पँथरच्या वतीने हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यंदा पारंपरिकरित्या चैत्यभूमीवर २९ मे रोजी होणारा वर्धापन दिन संभाव्य पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. तोच कार्यक्रम ज. वि. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे गानकोकिळा घनश्याम मोहिते यांच्या वंदनगीताने झाली. त्यानंतर उठाव साहित्य मंच, बबन सरवदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारित स्फूर्तिदायक कविता सादर केल्या.
यावेळी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना पँथर पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ज. वि. पवार यांची पत्रकार युवराज मोरे यांच्याशी दिलखुलास चर्चा. या संवाद सत्रात अनेक तरुणांनी थेट पवार साहेबांना प्रश्न विचारले. ज. वि. पवार यांनी नेहमीप्रमाणे सडेतोड, स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण उत्तरांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दलित युथ पँथरचे अध्यक्ष निलेश मोहिते यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन संतोष गणपत गायकवाड यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
कार्यक्रमाला दलित चळवळीतील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर आयोजकांनी उपस्थित जनतेचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेषतः संतोष गायकवाड, भूषण डांगळे, तुषार मोहिते, रमेश कांबळे, सुशिल सरकाळे, विनोद गायकवाड, गणेश खरात यांचा उल्लेख करत त्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आयोजकांनी साक्षीदारांकडून चांगल्या-वाईट प्रतिक्रिया घेण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यात आणखी प्रभावी कार्यक्रम करता येतील.
शेवटी, ज. वि. पवार यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून सांगितले की, “समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला समाज स्वतःच जबाबदार आहे, जोपर्यंत आपण आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून देत नाही, तोपर्यंत अन्याय सहन करावा लागेल.”