Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रबॅरिस्टर पी जी पाटील यांच्या नावाने इंग्लिश फेलोशीप सुरू करण्याची मागणी

बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या नावाने इंग्लिश फेलोशीप सुरू करण्याची मागणी

सातारा(अजित जगताप) : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मानसपुत्र बॅरिस्टर पी.जी. पाटील यांच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, या तीन विद्यापीठांमध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटील यांचे नावे शासनाने इंग्लिश अध्यासन व इंग्लिश फेलोशिप सुरू करावी असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी केले.

फलटण येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात, सातारा जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक सेवा संघातर्फे आयोजित बॅरिस्टर पीजी पाटील यांच्या १०४ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बेडकीहाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे फलटणचे मानद सचिव डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके हे होते.
बेडकीहाळ बोलताना म्हणाले, बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक व्यक्तिमत्व जडणघडणीत कर्मवीर अण्णांचे मोलाचे योगदान होते. ते अण्णांचे मानसपुत्र होते. रयत शिक्षण संस्थेचे सचिव तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. मुंबई विद्यापीठाच्या १४३ वर्षात विद्यापीठाची इंग्लिश फेलोशिप मिळविणारे ते पहिले मानकरी ठरले होते. बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण होऊन लंडनहून परत आल्यानंतर त्यांनी “आजीवन रयत शिक्षण संस्थेत काम करीन” हा कर्मवीर अण्णांना दिलेला शब्द त्यांनी अखेरपर्यंत पाळला. इंग्लिश व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना वाघिणीचे दूध पाजून परिपूर्ण जीवन जगण्यास समर्थ केले. बॅरिस्टर पीजी पाटील यांचे जीवन कार्य समाजाला व विशेषतः तरुण वर्गाला मार्गदर्शक व प्रेरणादायक ठरेल. म्हणून विद्यापीठांमध्ये व राज्यातील मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे उचित स्मारक होणे गरजेचे आहे. त्यासाठी सातारा जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक सेवा संघासह
समाजातील उच्चविद्याविभूषित व उच्च पदावर असलेल्या पी. जी. पाटील यांच्या शिष्यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रारंभी बॅरिस्टर पीजी पाटील व आचार्य बाळशास्त्री
यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य शांताराम आवटे, सातारा जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश खराते, उपाध्यक्ष टी. के. बाबर व सचिव रामराव नाईकवडी यांची मार्गदर्शक भाषणे झाली. यावेळी खनिजदर ढवण, प्राचार्य विजयसिंह पिसाळ, प्राथमिक शाळेचे चेअरमन रवींद्र बर्गे, सेवा संघाचे जेष्ठ सदस्य प्राध्यापक तुकाराम ओंबळे, एस वाय निकम रमेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य रवींद्र येवले यांनी प्रास्ताविक भाषण केले. मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी आभार मानले.

कॅप्शन- बॅरिस्टर पी जी पाटील व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ(मध्यभागी)व इतर उजवीकडून एस बी खराते, टी एस ढवण, प्राचार्य शांताराम आवटे आर एल नायकवडी व प्राचार्य रवींद्र येवले

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments