कराड(प्रताप भणगे) : कराड-पाचवड फाटा परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था गंभीर स्वरूप धारण करत चालली आहे. वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सतत प्रसिद्धी दिल्यानंतरही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस दुचाकीस्वारांची स्थिती अतिशय दयनीय होत आहे.
सरकारकडून फक्त कर वसुलीच?
नागरिकांचा सवाल आहे की, जेव्हा लाखो रुपयांचा वाहन कर, हेल्मेट, पीयूसी, विमा, परवाना अशा गोष्टींसाठी नियम लादले जातात, तेव्हा रस्त्याच्या दर्जाबाबत प्रशासन एवढं गप्प का? नागरिकांना सर्व नियम पाळायला लावणाऱ्या यंत्रणांनी स्वतःच्या जबाबदारीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह
या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराकडे देण्यात आले, ते काम योग्य प्रकारे करण्यात आले का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून केलेले हे काम काही महिन्यांतच खराब झाले आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रशासनाकडे दुर्लक्ष
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
आंदोलनाचा इशारा
तत्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा, तसेच साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा या मार्गावरून ये-जा करणारे सर्व स्थानिक रहिवासी रस्ता बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन यांनी याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.