मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.
संजय देशमुख यांच्या निधनाने आपली वैयक्तिक आणि सांघिकही खूप मोठी हानी झाली आहे.
सुसंवाद, सौम्यता आणि उत्तम कर्तव्यनिष्ठा हीच त्यांची खरी ओळख होती. शासन आणि जनतेतील दुवा म्हणून त्यांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली.
त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,” अशा शब्दांत सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संजय देशमुख यांची मुलगी सध्या जर्मनीत असून, त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी,शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे होणार आहे.
——