मुंबई (शांताराम गुडेकर) : मराठी पत्रकारितेतील वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवणारे दैनिक ‘स्वराज्य तोरण’ चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने गुणगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ठाण्यात शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी टाऊन हॉल, कोर्ट नाका येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळा व पत्रकार मेळाव्याच्या निमित्ताने हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, सरचिटणीस जगदीश सोनवणे, राज्य उपाध्यक्ष डॉ. दिलीप कोठावदे, कोकण विभाग संघटक अरुण बिराजदार, राज्य सल्लागार प्रमोद इंगळे, ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर करडे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके, आणि कार्यक्रमाचे आयोजक व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दुर्लक्षित समाजघटक, तसेच सामान्यांच्या प्रश्नांना आपल्या परखड लेखणीद्वारे वाचा फोडली आहे. सामाजिक अंलबजावणी, शासकीय योजनांची कार्यवाही, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय धोरणांवरील अभ्यासपूर्ण भाष्य ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक म्हणून त्यांनी केवळ वृत्तसंपादनच नाही, तर समाजप्रबोधनाचे कार्यही सातत्याने केले आहे. त्यांची लेखनशैली ठाम, समतोल आणि सुस्पष्ट असून, वाचकांमध्ये विचारप्रवृत्त करणारी आहे. या गुणवत्तेचीच दखल घेत ‘गुणगौरव पुरस्कार 2025’ देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, शिक्षक, वकील, पत्रकार आणि विद्यार्थ्यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरावर गौरविणे हा होता. त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्दात हेतू होता.
या राज्यस्तरीय मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन पत्रकार संघाचे राज्य संघटक व ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमने केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. ठाणे जिल्ह्यातील विविध माध्यमातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.डॉ. किशोर पाटील यांचा ‘गुणगौरव पुरस्कार 2025’ हा त्यांच्या मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा गौरव असून, हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण ग्रामीण पत्रकारितेच्या सचोटीचा अभिमान असल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.
चौकट
हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर ग्रामीण पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे. सत्य व निष्पक्षतेच्या मार्गावर चालणाऱ्या पत्रकारितेची ही थोडीशी पावती आहे. यामुळे अधिक जबाबदारीची जाणीव झाली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. किशोर पाटील यांनी पुरस्कार स्वीकृतीवेळी दिली.