Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम...

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

प्रतिनिधी :

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, माजी महापौर श्री.सुधाकर सोनवणे व श्री.जयवंत सुतार, माजी उपमहापौर श्री.अनिल कौशिक, माजी विरोधी पक्ष नेते श्री.नामदेव भगत, डॉ.राजेश पाटील, श्री.सिद्राम ओव्हाळ, श्री.महेश खरे, श्री. रविंद्र सावंत, श्रीम.शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.

नेरुळ से.26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार 2.80 मी. उंचीचा भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. तेथील दर्शनी भागात ध्यानमग्न मुद्रेत असलेल्या पुतळ्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात व लौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणा-या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबईत शहरात नागरिकांना आनंद देणा-या, समाजस्वास्थ्य वाढविणा-या गोष्टी करण्यावरही महापालिका भर देत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी त्याचाच एक भाग म्हणून ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या नागरिकांच्या आवडत्या ठिकाणी विश्वाला शांतीचा संदेश देणा-या व मानवजातीला प्रेरक विचारांनी भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा उभारण्यात आला असल्याचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले. जगाला सम्यक तत्वज्ञान देत मानवजातीला भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यामधून सर्वजण आंतरिक शांतीचा संदेश घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील धारण तलावाचे पुनरूज्जीवन करून या परिसराला आणखी आकर्षक बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे, उपअभियंता श्री.पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता श्री.सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार श्री.प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुत-यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments