कारेगाव : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घुसखोरी करून बनावट आधार कार्डसह मागील दोन वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कमरोल रमजान शेख (३२), अकलस मजेद शेख (३९), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (३५) आणि जाहिद अबूबकर शेख (३०) या आरोपींचा समावेश आहे.
हे सर्व आरोपी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथे राहत होते. दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस अंमलदार मोसिन शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, रांजणगाव पोलिसांसह संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 336(2)(3), 338, 340(2), पासपोर्ट कायदा 1950 चे कलम 3(a), परकीय नागरिक आदेश 1948 चे कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.