मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) धारावी प्रकल्पात येणाऱ्या पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियांची प्राथमिक यादी अर्थात प्रारुप परिशिष्ट – २ नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे. या प्राथमिक यादीत ८० टक्के झोपडपट्टीवासियांना अपात्र केले आहे,असा आरोप करीत धारावी बचाव आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते यांनी या यादीची होळी काल गुरुवारी धारावीत करण्याचा प्रयत्न केला.परंतु धारावी पोलिसांनी ही यादी आमदार महेश सावंत,माजी आमदार बाबुराव माने यांच्या हातातून हिसकावून घेऊन त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला.आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कारण देत या यादीची होणारी होळी धारावी पोलिसांनी रोखली.
धारावी बचाव आंदोलन या संघटनेने हे आंदोलन विभाग प्रमुख आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली केले.
डीआरपीची यादी म्हणजे ही अदानीने काढलेली पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांची बोगस यादी आहे.या यादीचे चार कागद जाळणे म्हणजे मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे पोलिसांचे तर्क अजब आहे.हे मनाला पटत नाही.म्हणून आम्ही धारावी बचाव आंदोलनाचे सर्व पदाधिकारी,नेते पोलिसांचा निषेध करीत आहोत,असे बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
डीआरपीच्या पात्र-अपात्र रहिवांशांच्या यादीत फक्त १०८ लोकच पात्र आहेत याचा निषेध म्हणून ही यादी धारावीतील लक्ष्मीबाग शिवसेना शाखेजवळ काल जाळण्याचा कार्यक्रम धारावी बचाव आंदोलन तर्फे आयोजित केला होता.यावेळेस फार मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलन स्थळास अक्षरश:पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. . आम्हास रोखण्याची पोलिसांची कृती अदानीस खूष करणारी असल्याची टीका आंदोलनाचे नेते महेश सावंत यांनी केली आहे.
यावेळी पोलिसांनी अदानीची बोगस यादी हिसकावताच धारावी बचाव आंदोलनाचे नेते आक्रमक झाले.दादागिरी करु नका,पोलिसांनो आम्हास शांततेत आंदोलन करु द्या… नाही जाणार …नाही जाणार….धारावी सोडून नाही जाणार… सर्वाना ५०० चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजे,अदानी हटाव,धारावी बचाव अशी जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांनी केली.
धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने म्हणाले धारावीतील ५५० रहीवाशांची यादी डीआरपीने जाहीर केली.या यादीनुसार फक्त १०१ रहिवाशी धारावीत पक्के घर मिळण्यास पात्र झालेले आहेत. ही बोगस अदानी यादी आम्हास मान्य नाही.धारावीतच धारावीकरांना ५०० चौ.फु.ची घरे द्या नाहीतर आमचे आंदोलन यापुढेही चालूच राहणार आहे.कोणालाही अपात्र करु नका सगळ्यांना घरे द्या ही आमची भूमिका आहे,असेही बाबुराव माने यांनी यावेळेस सांगितले.
या आंदोलनात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख आमदार महेश सावंत, माजी आमदार बाबुराव माने,गणेश खाड्ये, जोसेफ कोळी,गंगा देरबेर, महादेव शिंदे,एस.सावंत, शेकापचे राजेंद्र कोरडे,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उल्लेश गजाकोष,बसपाचे शामलाल जैस्वाल,आपचे राफेल पाॅल आदी सहभागी झाले होते.