कराड(विजया माने) : “ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच आणि सदस्यांनीच कामकाजाची जबाबदारी घ्यावी. आता व्यवहार संगणकावर होत असल्याने संगणकीय कौशल्य आवश्यक झाले आहे,” असे मत प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केले.
“ओळख ग्रामपंचायतीच्या कामकाजाची” या विषयावर सातारा तालुका व शहर पत्रकार संघ यांच्या वतीने वर्ये (ता. सातारा) येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मार्गदर्शन करताना प्राचार्य जाधव म्हणाले, “सरपंच हे कार्यकारी व प्रशासकीय प्रमुख असतात. सभासदांचा अभ्यासपूर्ण सहभाग गरजेचा आहे. वॉर्डसभा, महिला सभा, समित्यांच्या बैठकांची सध्या अंमलबजावणी होत नाही. अनेक सदस्य फक्त सहीपुरतेच उपस्थित राहतात, हे बदलले पाहिजे. गावाच्या विकासासाठी लोकसहभागातून नियोजन व अंमलबजावणी करावी.”
कार्यशाळेच्या प्रारंभी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान हेंद्रे यांनी पत्रकारांनी ग्रामपंचायतीच्या कायदेशीर कामकाजात सकारात्मक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. आभार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम यांनी मानले.
पत्रकार संतोष यादव व मिलिंद लोहार यांचा पत्रकारितेची पदवी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस तालुका व शहर पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.