कुडाळ(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीकरांनी विविध क्षेत्रात गुणवत्ता अनेकदा सिद्ध केली आहे. नुकतेच
वालुथ ता. जावळी येथील कन्या
मोहिनी अनिल गोळे यांनी महाराष्ट्र राज्य
लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत सलग तीन वेळा यश संपादन करून हॅट्रिक साधली आहे. यामुळे मोहिनी अनिल गोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या
सार्वजनिक बांधकाम विभागात राजपत्रित अधिकारी म्हणजेच सहाय्यक अभियंता म्हणून त्या कार्यरत होणार आहेत.अभ्यासातील सातत्य, योग्य मार्गदर्शन व चिकाटी या जोरावर सलग तीन वेळा यशस्वी होण्याचा त्यांचा फॉर्म्युला दिशादर्शक ठरला आहे. गुरु पौर्णिमेच्या कालावधीत त्यांनी गुरुचेही कार्य सार्थकी ठरवले आहे.
वालुथ गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल आनंदराव गोळे यांची मोहिनी गोळे या कन्या आहे. गेली दोन वर्षापासून स्पर्धा परीक्षेत अभ्यास करून तीन वेळा यशस्वी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.मोहिनी गोळे यांनी मार्च२०२४ मध्ये जलसंपदा विभाग पुणे येथे स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक , त्यानंतर
ऑक्टोबर २०२४ मध्ये मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र येथे जलसंधारण अधिकारी जि.प. ठाणे आणि जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्र राज्य सेवा राजपत्रित अधिकारी म्हणजेच सहाय्यक अभियंता पदावर पोहोचण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्याच मतदारसंघातील कन्या मोहिनी अनिल गोळे यांनी राजपत्रित अधिकारी पदावर मजल मारली आहे. ही जावळीकरांसाठी अभिमानास्पद बाब ठरलेली आहे. या यशामुळे वालूथ गावासह संपूर्ण जावळी तालुक्यात मोहिनी गोळे यांच्या कामगिरीचं कौतुक होऊन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
__________________________
फोटो– स्पर्धा परीक्षेत हॅट्रिक साधणाऱ्या मोहिनी गोळे