सातारा
(अजित जगताप ) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा प्रभाव टाकणारा सातारा जिल्हा आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात सत्ता व राजकीय पक्ष कार्यालय समीकरण झाले आहे. त्याला महायुतीतील भाजप अपवाद ठरत आहे. वर्षपूर्ती जवळ आली तरी सातारा जिल्हा भाजप कार्यालयावर एक साधी वीट उभी राहू शकली नाही. भाजपचे हे कार्यालय लवकर उभे राहावे. अशी भाजपच्या निष्ठावंतांच्या नजरा लागलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये जनसंघापासून उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली गेली होती. काँग्रेसच्या वाढत्या प्रवाहामुळे लव्हाळ्यासारखी भाजपची अवस्था झाली होती. तरीही अनेक निष्ठावंतांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणी सोडली नाही. आजही या निष्ठावंत पैकी बरेच जण भाजपमध्ये कार्यरत आहेत. सध्या भाजप पक्ष वाढला असला तरी काहींच्या बाबतीत विचारधारा लोप पावली आहे. हे आता निष्ठावंत भाजपवाले मान्य करत आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप मधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांची आठवण होते. सध्या भाजपमधील दत्ताजी थोरात, भरत पाटील, किशोर गोडबोले, अमित कुलकर्णी, सुवर्णाताई पाटील, कांताताई नलवडे, डॉ. दिलीप येळगावकर, बबनराव कांबळे, विक्रम पावसकर, सुरेश आफळे, प्रवीण शहाणे, अशी अनेकांची नावे डोळ्यासमोर येतात. काही हिंदुत्ववादी संघटनेत आज ही संलग्न आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यात सत्तेचा करिष्मा म्हणून भाजप पक्षामध्ये वाटचाल करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्ति निष्ठेला महत्त्व आल्यामुळे भाजपचे पद देताना त्याचा विचार करावा लागतो. सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यालय असावे म्हणून दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी सध्याचे मुख्यमंत्री व तात्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील, मदन भोसले, सदाशिव खाडे, प्रिया शिंदे व सध्या भाजपचेच आमदार असलेले मनोज घोरपडे, आ . डॉ. अतुल भोसले तसेच मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य भूमिपूजन झाले. तात्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी भारतीय जनता पक्ष वाढीसाठी चांगले योगदान दिले. पण काही निर्णय घेताना पक्षाची बाजू मांडावी लागते. त्यामध्ये त्यांना यश आले पण व्यक्तिगत पातळीवर टीका टिपणी सहन करावी लागली.
सध्या सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना मंत्रालय पातळीवर खूप मोठी किंमत वाढली आहे. हे जरी खरं असलं तरी भूमिपूजन होऊन सुद्धा एक वर्षाचा काळ झाला तरी भाजप जिल्हा कार्यालयाची एक वीट सुद्धा उभी राहू शकली नाही. भूमिपूजनाचा फलक भिंतीला आधार देत आहे. हे आता प्रकर्षाने जाणवू लागलेले आहे.
भाजप जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यात वाड्या वस्तीमध्ये पायपीट करून जनसंघ व भाजपची विचारधारा रुजवली आहे. आज अनेक जण राजकीय सत्ता मिळूनही बेरजेच्या राजकारणामुळे पडद्याच्या आड गेलेले आहेत. तरी ही सदर बाजार येथील महामार्ग लगत भाजप जिल्हा कार्यालय उभे राहावे. यासाठी आता पश्चिम महाराष्ट्राची भाजप जिल्हा कार्यालयाची जबाबदारी असलेले केंद्रीय कमिटीचे सदस्य भरत पाटील प्रयत्नशील आहेत. सध्या ते भारत देशात केंद्र सरकारने कमिटी मध्ये दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत.
सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यालयाची रचना श्री महाजनी, रवींद्र चव्हाण, सुमित बागडे करत असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा कार्यालय उभे राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे भाजप जिल्हा कार्यालय पूर्ण झाले. सांगली कार्यालयाचे बांधकाम अर्धे पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून सोलापूर जिल्ह्यासाठी जागा घेतलेली आहे. पुणे विभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालय सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात एका वर्षापूर्वी नंतरही भाजप कार्यालयाच्या बाबत हालचालींनी वेग घ्यावा अशी अपेक्षा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
सातारा जिल्हा भाजप कार्यालयामध्ये संदर्भ ग्रंथालय, बैठक हॉल, पदाधिकाऱ्यांसाठी कक्ष व माहिती तंत्रज्ञान कक्ष आणि कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांना बैठक व्यवस्था तसेच उपहारगृह असे सुसज्ज भाजप जिल्हा कार्यालय उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत भाजप निष्ठावंत सातारा नगरसेवक विजय काटवटे, सातारा शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर व सुनील काळेकर यांनी व्यक्त केले आहे.
______________________
फोटो– भाजप जिल्हा कार्यालयाची नियोजित जागा व भूमिपूजन फलक (छाया– अजित जगताप सातारा)