Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रअटल सेतूवरून डॉक्टरची समुद्रात उडी!जे. जे. हॉस्पिटलचे डॉ. ओंकार कवितके बेपत्ता; ३६...

अटल सेतूवरून डॉक्टरची समुद्रात उडी!जे. जे. हॉस्पिटलचे डॉ. ओंकार कवितके बेपत्ता; ३६ तासांपासून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

मुंबई(सतिश वि.पाटील) : जे. जे. रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२) यांनी अटल सेतूवरून थेट समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी (७ जुलै) रात्री उशिरा घडली. तेव्हापासून डॉक्टर बेपत्ता असून, उलवे पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. सध्या ३६ तासांहून अधिक काळ शोधमोहिम सुरू असून, डॉक्टरांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

डॉ. ओंकार हे कळंबोली–पनवेल सेक्टर २०, अविनाश सोसायटी, प्लॉट क्र. ६७ येथे वास्तव्यास होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आपली होंडा कंपनीची चारचाकी थांबवून थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ही माहिती अटल सेतू पोलीस कंट्रोल रूमला रात्री ९.४५ वाजता मिळाली.

सूचना मिळताच न्हावा–शेवा बंदर विभागाअंतर्गत उलवे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. घटनास्थळी आढळलेल्या कार व आयफोनच्या आधारे पोलिसांनी डॉ. ओंकार यांचे कुटुंबीय शोधून काढले. त्यांच्या बहीण कोमल लंबाते यांना कळंबोली येथून पोलीस ठाण्यात बोलावून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

अटल सेतू वाहतुकीस खुला झाल्यानंतरचा हा तिसरा डॉक्टर आत्महत्येचा प्रकार असल्याचे समोर आले असून, याआधी बँक मॅनेजर आणि अभियंत्यांनीही अशाच प्रकारे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

बेपत्ता डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक, तसेच सागरी सुरक्षा विभागाची ‘ध्रुवतारा’ बोट तैनात करण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांचा अजूनही काही थांगपत्ता लागलेला नाही.

कोणास डॉक्टर ओंकार कवितके यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, कृपया उलवे पोलीस ठाणे (०२२–२०८७०६७०) या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणी यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments