मुंबई(रमेश औताडे) : शिक्षकांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.जे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. सरकार फक्त आदेश काढते पण निधीची तरतूद करत नाही. शिक्षकांचा प्रश्न आज किंवा उद्या मार्गी लावावा. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देत सांगितले.
वाढीव अनुदानाच्या रक्कमेची तरतूद आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात आले होते.
मला ५६ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे आणि निर्णय कसे घ्यायचे, निधीची तरतूद कशी करायची हे चांगले माहीत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. शरद पवार आता मैदानात उतरत शिक्षकांना पाठिंबा देणार आहेत म्हणून शिक्षक आनंदी होते. शरद पवार यांनी शिक्षक आंदोलनांना भेट देत इतर आंदोलनाला भेट दिली.
भर पावसात आंदोलने होतात. उन्हाळ्यात भर उन्हात अनेक आंदोलनकर्ते चक्कर येऊन पडतात. त्यामुळे सरकारने याबाबत एक कायमस्वरूपी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठी स्वच्छता गृह, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी एका आंदोलन कर्त्याने पवार यांच्याकडे केली.