प्रतिनिधी : मुंबईत दादर ते बोरिवली तसेच अन्य भागांतील फेरीवाल्यांना उठवण्याच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेली १५ ते ४० वर्षे रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हजारो फेरीवाल्यांना अन्यायकारकरीत्या हटवण्यात येत असल्याचा आरोप करत संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने १२ जुलैपासून बेमुदत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच १५ जुलै रोजी छत्रपती शिवाजी पार्क, दादर ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेकडून करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून फेरीवाल्यांसाठी कर्ज योजना राबवल्या जात असताना, मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासन फेरीवाल्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासन एकीकडे स्वयंरोजगारासाठी योजना जाहीर करत असताना, दुसरीकडे फेरीवाल्यांचे जगणेच उध्वस्त करणारी भूमिका घेतली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत:
- महापालिकेने योग्य सर्वेक्षण करावे.
- अधिकृत शुल्क आकारून शासकीय महसूल वाढवावा.
- फेरीवाल्यांना वाटेल तसे हटवू नये किंवा त्यांचा माल उचलू नये.
- फेरीवाल्यांवर अन्यायकारक दंड आणि कारवाई थांबवावी.
१२ जुलैपर्यंत समाधानकारक निर्णय न झाल्यास एकही फेरीवाला रस्त्यावर व्यवसाय करणार नाही, असा ठाम इशारा देत, संघटनेने संपूर्ण मुंबईत बेमुदत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.